|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
आज सकाळची कन्सलटेशन्स उरकली आणि गौरव पेठे हा ज्योतिष अभ्यासक आम्हांला भेटायला आला. त्याला काही ज्योतिषविषयक शंकांचे निरसन करून घ्यायचे होते म्हणून त्याने काल आम्हांला फोन केला होता. आम्ही त्याला दुपारी बाराची वेळ दिली होती आणि त्यानुसार पेठे बरोब्बर बारा वाजता आमच्या घरी पोहोचला.
तो आल्यावर सौभाग्यवतींनी चहा करून दिला. चहा घेत आमचा विषय सुरू असतांना गौरव म्हणाला की,
"पंत, मला जन्मवेळेची शुद्धी करायला अजूनही नीट जमत नाही. ते करणं खूप किचकट वाटतं. एखाद्या जातकाची जन्मवेळ त्याला निश्चित माहित नसेल तर अशा पत्रिका बघणे जीवावर येतं. तर त्याबद्दलच मला तुम्हांला विचारायचे आहे."
आम्ही दोन वर्षांपूर्वी ज्योतिषशास्त्राच्या खाजगी शिकवण्या घेतल्या होत्या. दहा-बारा जणांचा एक ग्रुप होता. त्यांनी आम्हांला त्यांच्याच एका मित्राच्या घरी येऊन शिकविण्याची विनंती केली होती. त्या मित्राचे घर आमच्या घराजवळ असल्याने आम्ही मान्यता दिली आणि वर्षभर त्यांना आठवड्यातून एक दिवस आम्ही केपी शिकवली. पुढे त्यातील तीन-चार जण मध्येच गळले, पण बाकीच्या आठ जणांनी शेवटपर्यंत येऊन सर्व अभ्यासक्रम शिकून घेतला. हा गौरव पेठे त्यापैकी एक.
आम्ही गौरवला विचारले, " तुला जन्मवेळेची शुद्धी करतांना नक्की काय समस्या येतात?"
त्यावर तो म्हणाला, " रुलिंगमधले ग्रह जर नीट मिळाले तर जमतं. पण कधी कधी तसं होत नाही. रुलिंगमधले ग्रह मदत करत नाहीत. कधी कधी जातकाचा जन्म दोन लग्नांच्या संधीवर असतो आणि दोन्ही लग्नस्वामी रुलिंगमध्ये नसतात. त्यावेळेस खूप "कन्फ्युजन" होतं. अशा पत्रिका फार त्रास देतात. त्यामुळे कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत"
आम्ही म्हटले, " तुझे लग्न झाल्यावर जर तू असे म्हणालास की, ' कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत' तर तुझी बायको राहील का तुझ्याबरोबर?"
आमच्या वाक्यावर तो खळखळून हसत म्हणाला, " पंत, ते दरवेळेस जमतं हो"
आम्ही विचारले, " जेव्हा तुला जन्मवेळशुद्धी करायला जमत नाही, तेव्हा तू काय करतोस? पत्रिका कशी बनवतोस?"
तो म्हणाला," मी ती पत्रिका सरळ बाजूला ठेवून देतो. नंतर काही तासांनी पुन्हा प्रयत्न करतो. तेव्हा रुलिंगप्लॅनेट्स बदलले असतील (लग्न आणि लग्नाबरोबर इतर) तर मला जमतं. नाहीतर पुन्हा काही तासांनी/ दुसर्या दिवशी प्रयत्न करतो."
आम्ही त्याला म्हटले, " असे करणे हे सर्वस्वी चूक आहे. ज्यावेळेस आपण जन्मवेळेची शुद्धी करायला बसतो, त्या वेळेचेच रुलिंग प्लॅनेट्स आपल्याला त्या व्यक्तीची अचूक जन्मवेळ सांगतात. हे असे रुलिंग प्लॅनेट्स बदलायची वाट पाहून आजचे उद्यावर ढकलणे अशास्त्रीय आहे."
असे म्हणत आम्ही आमची जी-मेलची पत्रपेटी उघडली. त्यातील एक ईपत्र काढले. त्या जातकाच्या सौभाग्यवतींनी हे पत्र पाठवले होते. जातकाच्या जन्मवेळेबद्दल शंका होती. त्या पत्राचा जन्मवेळेचा मजकूर इथे कॉपी पेस्ट करून चिकटवत आहोत जो आम्ही गौरवला दाखवला. गोपनीयतेच्या कारणास्तव जातकाचे नाव लपवले आहे.
| hide details 19:16 (19 hours ago) | ||||||||||||||||||||||||||||||||
नमस्कार पंत
आज संध्याकाळी आपल्याशी बोलणे झाल्याप्रमाणे खालील माहिती पाठवत आहे
जातक : *** *** ***
जन्मवेळ (approx ) : ३.२० दुपारी, नागपूर, २२/११/७७
आम्ही गौरवसमोर स्क्रीनवर पत्राचा एवढा मजकूर ठेवला. त्याला म्हटले, " या जातकाची जन्मवेळशुद्धी करायची आहे. त्याची अचूक जन्मवेळ शोधून काढून पत्रिका बनवायची आहे. ती सुद्धा आत्ताच. जे असतील ते रुलिंग प्लॅनेट्स घेऊन. तू कर सुरू आम्ही आलोच तंबाखू लावून. "
असे म्हणत आम्ही त्याला आमच्या खुर्चीत बसवले व त्याच्या हाती एक पॅड आणि पेन दिले. संगणकावर सॉफ्टवेअर सुरू होते. हाताशी पंचांग होते.
तेवढ्यात बेल वाजली आणि आमचे मित्र श्री. परब आले. परबांनी आल्याआल्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. आम्ही विचार केला की, आज रविवारी हा मालवण्या डबा घेऊन आला म्हणजे काहीतरी खास असेल.
परबांना म्हटलं, " परबांनू, हे काय?"
ते म्हणाले, " हा उंधियो आहे स्पेशल."
आम्ही म्हटले, " हत तिच्यायला....... आम्हांला वाटले वहिनींनी मस्त पापलेटाचं कालवण करून दिलं असेल. तर हे गुजरगांड्यांचे पदार्थ कसले घेऊन आलात?"
परब म्हणाले, " अहो लता ( त्यांची कोळीण) होळीसाठी गावाला गेलेय. आम्ही मार्केटमधून कधी बाजार आणत नाही. त्यामुळे ती येईपर्यंत पापलेट, सुरमई काही नाही."
परबांचा चहा झाला आणि ते गेले. आम्ही गौरवकडे आलो. म्हटलं, " काय महाराज, जातकाची अचूक जन्मवेळ मिळाली की नाही अजून?'
पेठे ने हिरमुसला चेहरा करून सांगितले, " पंत, यात खूप लोच्या आहे."
आम्ही म्हटले, " म्हणूनच तुला करायला दिलेय. संधीवर लग्न येताय. बरोबर?"
तो म्हणाला, " हो ना. आणि दोन्ही लग्नांपैकी एकही लग्नस्वामी रुलिंगमध्ये नाहीये."
" म्हणजेच तुला जन्मवेळशुद्धीबाबत ज्या समस्या आहेत, त्याच समस्या या ठिकाणी आहेत. बरोबर?'
"बरोबर"
"मग आपण या जातकाची अचूक जन्मवेळ शोधून काढू. म्हणजे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल."
पेठे खूश झाला. आम्ही त्याला म्हटले, " तुझे आत्ताचे रुलिंगप्लॅनेट्स काय आहेत?"
तो म्हणाला, " पंत, आत्ता वृषभ लग्न सुरू आहे. चंद्र केतुच्या मघा नक्षत्रात आहे. सिंह राशीत. आज वार रविवार आहे."
" वृषभेत लग्ननक्षत्र कुठले सुरू आहे?"
"रोहिणी"
"म्हणजे तुझे रुलिंग प्लॅनेट्स हे शुक्र, चंद्र, केतु, रवि, रवि हे झाले. बरोबर?"
तो म्हणाला, " हो हो. हे काय मी लिहिले आहेत ना" असे म्हणत त्यांनी लिहिलेले रुलिंगप्लॅनेट्स आम्हाला दाखवले.
अभ्यासकांपैकी ज्यांना खोलात जायचे असेल त्यांनी, दिनांक २८ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी १२.२६ चे मुंबई अक्षांशाचे रुलिंग प्लॅनेट्स मांडावेत.
आम्ही म्हटले, " आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ. नागपूरच्या क्षितिजावर जन्मदिवशी म्हणजे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.२० च्या सुमारास कोणते लग्न सुरू होते?"
" दुपारी ०३.२१ पर्यंत मीन लग्न होते, पुढे मेष सुरु झाले." पेठे
"आता यापैकी कोणत्या लग्नावर जातक जन्माला आला असेल हे आपल्याला शोधायचे आहे. मीनेचा आणि मेषेचा मालक कोण आहे?"
"गुरू आणि मंगळ"
" यापैकी कोणीही तुझ्या रुलिंगमध्ये नाही. मग तू कोणते लग्न निवडणार?"
"हाच तर प्रॉब्लेम आहे."
"यात प्रॉब्लेम काहीही नाही. आपण ठराविक पातळीच्या पलिकडे दृष्टी टाकत नाही. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम वाटतो. मीनेत शेवटी कुठले नक्षत्र आहे?"
"रेवती"
"मालक?"
"बुध"
"बुध रुलिंगमध्ये आहे?
"नाही"
"मेषेची सुरूवात कशाने होते?"
"अश्विनी"
"मालक?"
"केतु"
"केतु रुलिंगमध्ये आहे?"
"होय. आणि तो सुद्धा नक्षत्रस्वामी म्हणून आलेला आहे."
"तुम्हाला जन्मवेळशुद्धी शिकवतांना राहु-केतु बद्दल मी एक महत्त्वाचा नियम सांगितला होता. तो कोणता?"
"अरे हो! पंत, तुम्ही म्हणाला होतात की जन्मवेळशुद्धीच्या वेळेस जेव्हा नक्षत्र निश्चित करायचे असते, तेव्हा जर राहु-केतु रुलिंगमध्ये नक्षत्रस्वामी म्हणून आले असतील तर त्यांचेच नक्षत्र असते."
"व्हेरी गुड. आता मला असे सांग की, हा नियम फक्त पाठ करून डोक्यात ठेवायचा की आवश्यक आहे तिथे वापरायचा?"
"ओ सॉरी. हे माझ्या लक्षातच नाही आलं. त्यामुळे केतुचेच नक्षत्र आहे. म्हणजेच जातकाचा जन्म अश्विनी नक्षत्रावरच झालेला आहे. बरोबर ना, पंत?" पेठ्याचा आम्हांलाच प्रतिप्रश्न.
"अश्विनी नक्षत्रावर जन्म झालाय तर लग्न कोणते असेल मीन की मेष?"
"अर्थात मेष"
"म्हणजे आता जातकाचे मेष लग्न, अश्विनी नक्षत्र हे निश्चित झाले. अश्विनी नक्षत्र कधी सुरू झाले आहे?"
"दुपारी ०३ वाजून २२ मिनिटांनी"
"म्हणजे जातकाची जन्मवेळ ०३.२२ पासून पुढे आहे."
"यस सर" पेठ्याला इंग्रजी मड्डम चावली.
"आता आपल्याला उपनक्षत्र निश्चित करायचे आहे. आपण रुलिंगमधील केतु वापरला.. शिल्लक कोणते ग्रह राहिले?"
"शुक्र आणि रवि"
"या दोघात बलवान कोण?"
"शुक्र. कारण तो लग्नस्वामी म्हणून आला आहे. रवि हा राशीस्वामी आहे त्यामुळे शुक्र हाच बलवान आहे."
"उत्तम. शुक्राचे उपनक्षत्र मेषेत किती अंश ते किती अंश आहे?"
पेठ्यांनी उपनक्षत्रस्वामीचे कोष्टक उघडले. आम्ही ते त्याच्या हातातून खेचून घेऊन बाजूच्या स्टुलावर टाकले. त्याला म्हटले,
"पेठे, अशी कोष्टके पाहून कुणीही उत्तरे देईल. १ ते २४९ नंबरच्या सबचे कोष्टक तोंडपाठ करा असे आम्ही तुम्हाला शिकवतांना म्हटले होते. दोन वर्ष केपी शिकून झाली अजून तुझे कोष्टक तोंडपाठ नाही. असा अभ्यास करून कोणी महान ज्योतिषी होईल काय?"
" अहो पंत, तुम्ही म्हणाला होतात खरे. पण एवढे मोठे कोष्टक तोंडपाठ होईल काय? हे शक्य तरी आहे का?"
"का शक्य नाही? आमचे हे संपूर्ण कोष्टक तोंडपाठ आहे. झोपेतून उठवून आम्हाला विचारले तरी एखादा ग्रह अमुक राशीत, अमुक अंशावर, अमुक कलांवर, अमुक विकलांवर आहे तर त्याचा सबलॉर्ड कोण हे आम्ही सांगू शकतो. जर आम्ही हे करु शकतो तर तू का नाही करू शकत?"
पेठे ने हात जोडत म्हटले, "पंत, तुम्ही महान आहात."
म्हटलं, " आम्ही महान आहोत हे सांगायचे नाहीये आम्हाला. तर आपण जे शास्त्र शिकतो त्यावर आपली प्रचंड मास्टरी असणे आवश्यक आहे हे सांगतोय. आम्ही महान नाही. हे कोष्टक कृष्णमूर्ती गुरूजींना तोंडपाठ होते, हसबे गुरूजींना तोंडपाठ होते, विजय हजारींना हे तोंडपाठ आहे. आम्ही एकट्याने काही मोठे केले आहे असे समजण्याचे कारण नाही. "
"शुक्राचे उपनक्षत्र मेषेत केतुच्या नक्षत्रात ०० अंश ४६ कला ४० विकला ते ०३ अंश ०० कला ०० विकला एवढे आहे. जातकाचा जन्म शुक्राचा सब नागपूरच्या पूर्वक्षितिजावर उदीत असतांना झाला आहे. त्यात रविचा सब-सब शोधला म्हणजे जातकाची अचूक जन्मवेळ मिळेल. सॉफ्टवेअरच्या दिलेल्या कोष्टकात ती १५ वाजून २५ मिनिटे इतकी दाखवली आहे. हीच जातकाची अचूक जन्मवेळ आहे."
"क्या बात है !" असे पेठे जोरात ओरडला.
म्हटले, " आता या वेळेनुसार त्याची कुंडली तयार कर."
पेठ्याने एक मिनिटात संगणकावर कुंडली बनवली.
म्हटलं, " आपली कुंडली बरोबर आहे की नाही हे आता पाहिले पाहिजे. आपले काम अचूक पाहिजे. कसे पाहणार?"
पेठे डोक्यात ऊवा झाल्यासारखे डोके खाजवायला लागला. मग एकदम म्हणाला,
" हं पंत, तुम्ही म्हणाला होतात की पत्रिका बनवल्यावर त्याचा महादशास्वामी लिहून घ्या. महादशास्वामी ज्या स्थानांचा कार्येश असतो त्याच स्थानासंबंधी जातकाचा प्रश्न असतो."
"व्हेरी गुड. या कुंडलीला कुठली महादशा सुरू आहे?"
" या कुंडलीला २७/०२/२००५ पासून रविची महादशा सुरू आहे. पंत, रवि स्वतः अष्टमात असून तो पंचमेश आहे. आणि तो पंचमस्थ शनीच्याच नक्षत्रात आहे. रवि अष्टमस्थ बुधाच्याच उपनक्षत्रात आहे."
"उत्तम. आता तुला सांगतो की या जातकाला त्याच्या व्यवसायासंबंधीच समस्या आहेत. हा माणूस एमबीए फायनान्स आहे. पण नोकरी न करता, पुण्याच्या रांजणगावं जवळ काही एकर जमीन घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, प्लांटेशनचा व्यवसाय करतो. रवि महादशा सुरू झाल्यापासून याच्या व्यवसायात प्रचंड समस्या येत आहेत. त्यामुळे काय करावे असा प्रश्न त्याच्या सौभाग्यवतींनी विचारला आहे. जातक जेव्हा नोकरी, व्यवसायाच्या समस्या घेऊन आपल्याकडे येतो, तेव्हा त्याचा महादशास्वामी पाच, आठ, नऊ, बारा या स्थानांशी संबंधीत असतो हे मी तुम्हाला शिकवले आहे. झाली कुंडली टॅली? मिळाले प्रश्नाचे उत्तर?"
"त्या बाईंनी पूर्वी कुणाला कुंडली दाखवली असेल आणि त्यांनी ०३.२० जन्मवेळ धरून कुंडल्या मांडल्या असतील तर या पत्रिकेबद्दल भरमसाठ भाकीते केली असतील जी वस्तुस्थितीला धरून नाहीत. कारण ०३.२० या जन्मवेळेप्रमाणे मीन लग्न येते आणि मीन लग्नाच्या कुंडलीला रवि षष्ठेश होऊन षष्ठस्थ शनिच्या नक्षत्रात येतो. त्यामुळे रवि महादशेत याचा व्यवसाय प्रचंड चालायला हवा होता. पण तसे घडलेले नाही, हे वास्तव आहे."
हे सर्व ऐकून पेठ्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो आम्हाला म्हणाला, "पंत, मला तुम्हाला नमस्कार करायचाय."
आम्ही त्याला थोपवत स्वामींकडे हात दाखवून म्हटले, " नमस्कार त्यांना करायचा. आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत."
" ते तर आहेतच. त्यांच्यामुळेच इथपर्यंत आलो' असे म्हणत पेठ्याने स्वामींना दंडवत घातला.
पण त्याचा आम्हाला नमस्कार करण्याचा हट्ट तो सोडेना. शेवटी नाईलाजास्तव आम्ही उभे राहिलो. पेठ्याने वाकून नमस्कार केला.
म्हणाला, " पंत, आज तुम्ही जे सांगितलेत त्यामुळे यापुढे जन्मवेळशुद्धी करतांना माझे कुठे अडणार नाही. मला हे ज्ञान मिळावं अशी स्वामींचीच इच्छा असावी म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवले असे मी मानतो. आणि कधी अडलेच तर काय करायचे, कुणाकडे जायचे? या प्रश्नाचे उत्तरही स्वामींनी दिले आहे.
आजच मठात जाऊन नारळाचे तोरण बांधतो."
आपला,
(कृतकृत्य) धोंडोपंत
(कृतकृत्य) धोंडोपंत



